चंद्रपूर : राज्यातील नगरपरिषद निवडणूक रणसंग्रामातील मुख्यमंत्र्यांची आजची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात पार पडली. भद्रावती शहरात विकासाच्या योजना राबविण्यासाठी भाजपला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलंय. आपण प्रचार सभेत विरोधकांवर टीका करत नाही. आम्ही सकारात्मक विचार घेऊन आलोय. आम्ही एक विकास आराखडा घेऊन जनतेपुढे जात आहोत असे सांगत आपल्याकडे नीती, नियत आणि निधी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीसांनी सुचकपणे भाष्य केलं आहे.
सर्वधर्म आणि संस्कृतींचा भद्रावती येथे संगम आहे
लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी यावेळी भाषणाला सुरुवात केली. सर्वधर्म आणि संस्कृतींचा भद्रावती येथे संगम आहे. या मतदारसंघात सरकारने मोठा पैसा दिलाय. मी कोणावरही टीका करत नाही, आम्ही विकासाचा मॉडेल घेऊन आलोय, आमच्याकडे नीती आहे, नियती आहे आणि निधी देखील आहे. छोट्या शहरांमध्ये जर आपण निधी दिला तर आपण या शहरांचा चेहरा बदलू शकतो. शहरामध्ये संधी असल्यामुळे गावातले लोक शहराकडे जातात. पण नियोजन नसल्यामुळे शहरांची अवस्था बिकट झालीय. मोदीजींनी पहिल्यांदा देशातल्या शहरांसाठी विविध योजना सुरू केला, त्या योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांच्या विकासासाठी मोदीजींनी दिलेत. शहरातील घरांचे पट्टे आम्ही देणार आहोत, म्हणजे त्यांचा विकास करता येईल.
भद्रावती शहराला पाण्यासाठी आम्ही स्वयंपूर्ण करू. निप्पॉन डेनरोच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही सोडवू, अधिवेशन काळात त्यावर निर्णय घेऊ.आम्ही जे बोलतो ते करतो. विजय झाल्यावर काही लोकांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होईल. पण मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना लाडक्या बहिणींना दिला आहे. 2400 आजारांना पाच लाखांपर्यंत मदत देणार आहोत आणि 9 असे आजार आहे ज्यांच्या उपचारासाठी 35 लाखापर्यंत मदत दिली जाईल. दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतरचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नगर परिषदेवर 25 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्षांचे नगराध्यक्षपद उमेदवार आजी-माजी शिवसैनिक आहेत. विशेष म्हणजे अगदी 4 दिवसांपूर्वी याच मैदानावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचीही सभा झाली होती. त्यामुळे दोन मित्रपक्षांमध्ये होणाऱ्या इथल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.